मुंबई : मुंबईत आज तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर धावतील. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवर कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या वेळेत ब्लॉक असेल. कल्याणवरुन सकाळी 10.54 ते दुपारी 4.19 या वेळात सुटणाऱ्या सर्व लोकल कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.22 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ बेलापूर/ पनवेलपर्यंतची सेवा सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत बंद राहील. डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंत सेवा सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहील.

विशेष लोकल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रविवारी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत बंद राहील. अप हार्बर लाइनवर वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंतची सेवा सकाळी 10.45 ते 4.58 या वेळेत बंद राहील. यावेळी मुंबईत दाखल होणाऱ्या मेल/ एक्स्प्रेस वीस ते तीस मिनिटे उशिराने पोहचतील. तर हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.