मुंबई : कांदिवलीतील एका कोरोना लसीकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. 390 जणांकडून पैसे घेऊन बनावट लस दिल्याचा आरोप कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेजमधील रहिवाशांनी केला आहे. एका नामांकित रुग्णालयाच्या नावे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची अधिकृतता पडताळल्यानंतर ते बनावट असल्याचे समजल्यानंतर या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे.


कांदिवलीच्या बनावट लसीकरण प्रकरणाबाबत मुंबई महापालिकेनं दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उपायुक्त शंकरवार चौकशी करणार आहेत.या संपूर्ण प्रकरणाची 48  तासांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरीक्त महापालिका आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिले आहेत.  कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज मध्ये 390 रहिवाशांना कोविडची लस दिली होती. मात्र, या रहिवाशांनी आपल्याला बनावट लस दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. महापालिकेनंही याप्रकरणी आता मुंबई पोलिसांना चौकशीकरता पत्र दिले आहे.