मुंबई : जोगेश्वरी येथील आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या (Mumbai Metro) चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव सध्या रद्द करण्यात आला आहे, भविष्यात गरज पडल्यास त्याचा विचार करू अशी कबुली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिली. त्यामुळे या मेट्रो स्टेशनला आता तीनच मुख्य प्रवेशद्वार राहणार आहेत.


आम्ही 2031 पर्यंत चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव पुढे ढकलत आहोत. प्रवाशांची संख्या बघून भविष्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी सोमवारी ही माहिती दिली. आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव तूर्त रद्द करण्यात आला असल्याचं पत्रच सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी हायकोर्टात सादर केलं.


काय आहे याचिका?


आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वारासाठी तिथं असलेल्या रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टची जागा घेतली जागा घेतली जाणार आहे. त्याविरोधात ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सोमवारी यासंदर्भात झालेल्या सुनावणीत ट्रस्टचे वकील हजर नव्हते. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने ही सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. पुढील सुनावणीत आम्ही एमएमआरडीएचं पत्र दाखल करुन घेत यावर ट्रस्टचं म्हणणं ऐकून घेऊ, असं हायकोर्टानं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. या याचिकेत म्हाडाकडून ॲड. प्रकाश लाड तर राज्य सरकारकडून ॲड. मिलिंद मोरे बाजू मांडत आहेत.


काय आहे प्रकरण?


मेट्रो 2-अ, दहिसर(पूर्व) ते डी.एन.नगर अशी मेट्रोची स्वतंत्र मार्गिका आहे. या मार्गिकेत जोगेश्वरीत आदर्श नगर मेट्रो स्टेशन आहे. या स्टेशनसाठी चौथ्या प्रवेशद्वाराचं नियोजन एमएमआरडीएनं केलेलं आहे. त्यासाठी येथील रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टच्या भूखंडावर हे प्रवेशद्वार प्रस्तावित आहे. हा भूखंड म्हाडानं यापूर्वीच ट्रस्टला दिलेला आहे. मात्र या चौथ्या प्रवेशद्वारासाठी या भूखंडाची 1179 चौ.मी. जागा घेतली जाणार आहे. याला ट्रस्टचा विरोध नाही, मात्र त्या बदल्यात ट्रस्टला टीडीआर आणि एफएसआय मिळण्याची प्रक्रिया नियमानुसार व्हावी, अशी ट्रस्टची मागणी आहे.


इतर महत्त्वाची बातमी :