मुंबई : मुंबई आयकर विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, आयकर खात्यातील अपील विभागाचे आयुक्त बी व्ही राजेंद्र प्रसाद यांच्यासह सहा जणांना अटक केली.

दिल्ली आणि विशाखापट्टणम सीबीआयच्या टीमने मुंबई सीबीआय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. एस्सार स्टील्स कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप बी व्ही राजेंद्र प्रसाद यांच्यावर आहे.

बी व्ही राजेंद्र प्रसाद यांनी एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॅपिटिव्ह पॉवर प्लांटच्या बालाजी ट्रस्टला आयकरमध्ये सूट देऊन गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितली होती. यासाठी 100 कोटी रुपये मागितले होते, असंही कळतं. त्यापैकी 1.5 कोटी रुपयांचा पहिला हफ्ता देण्यात आला. त्याचवेळी राजेंद्र प्रसाद यांच्या साथीदारांना अटक केली.

सीबीआयने मंगळवारी रात्री बीव्ही राजेंद्र प्रसाद यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकाला. आतापर्यंतच्या छापेमारीत सगळ्या आरोपींकडून 19 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

सीबीआयने या प्रकरणात राजेंद्र प्रसाद यांची साथ देणाऱ्या प्रदीप मित्तल, (ऑपरेटर, एस्सार ग्रुप), श्रेयस पारीख, (सीए), बा व्ही राजेंद्र, ज्वेलर्स कम हवाला ऑपरेटरलाही अटक केली.