मुंबई : मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड पडल्यामुळे दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मृत्यू झाला. मात्र कांचन यांच्या मृत्यूसाठी नारळाचं झाड नव्हे तर खुर्ची उबवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं उघड झालं आहे.

मुंबईतल्या चेंबूरच्या रस्त्यावर घडलेल्या दुर्घटनेची दृश्यं पाहून सारेच हळहळले. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या कांचन रघुनाथ यांचा अंगावर नारळाचं झाड पडल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कांचन यांच्या मृत्यूसाठी नारळाच्या झाडापेक्षा मुंबई महापालिकाच अधिक जबाबदार आहे का? कारण धोकादायक नारळाचं झाड तोडण्यासाठी स्थानिकांनी पालिकेच्या दरबारी दोनदा अर्ज केला होता. ज्याकडे यंत्रणेनं साफ दुर्लक्ष केलं होतं.

प्रश्न असा आहे, की यंत्रणेत काम करणाऱ्यांना खुर्च्या फक्त उबवण्यासाठी दिल्या आहेत का? ज्या पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कांचन रघुनाथ यांना जीव गमवावा लागला, त्यांनी आपले मोबाईल फोन बंद करुन ठेवले आहेत.

'एबीपी माझा'नं त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

ज्या बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांमुळे कांचन रघुनाथ यांना नाहक जीव गमवावा लागला, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.