मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे रुळावर घातपाताचा डाव उधळला. छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी स्टेशनजवळ, अप धीम्या मार्गावरील ट्रॅकवर चार फूट लांबीचा रेल्वे रुळाचा लोखंडी रॉड आढळला. तसंच रुळालगत असलेल्या सिग्नलवर दगडफेक करुन काचा फोडण्याचाही प्रयत्न केला.


सीएसएटी यार्डात काम करणारे पॉईंटमन सुरेंद्रकुमार शर्मा यांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी दगडफेक करणाऱ्या आणि लोकंडी रॉड ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

सुरेंद्रकुमार शनिवारी दुपारी सीएसटी यार्डात काम करत होते. त्यावेळी कर्नाक ब्रिजच्या खाली पोलजवळ एक तरुण त्यांना दिसला. हा तरुण रेल्वे रुळालगत असलेल्या सिग्नलवर दगड मारुन काचा फोडण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अप धीम्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकमध्ये त्याने रेल्वे रुळाचा लोखंडी रॉड ठेवल्याचं समोर आलं. यानंतर सुरेंद्रकुमार यांनी त्याच्या दिशेने धाव घेत तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

देवा सुखलाल कोल उर्फ अमर (वय 19 वर्ष) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. हा तरुण फुगे विकण्याचं काम करतो. त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, याआधी दिवा, मुंब्रा, पनवेल या ठिकाणी यापूर्वी रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता सीएसटी स्टेशनवर अमरने रॉड ठेवल्याचं उघड झालं. परंतु अमरने हे कृत्य का आणि कोणाच्या सांगण्यावरुन केलं याचा तपास पोलिस करत आहेत.