मुंबई : अमेरिकेतील टेक्नॉलॉजी फर्ममध्ये कार्यरत एका उच्चपदस्थाला मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी बेड्या ठोठवण्यात आल्या. मात्र आपण 'बॉम्ब' नाही, तर 'बॉम्बे' म्हणजेच मुंबई म्हटल्याचा दावा आरोपीने केला आहे.
भारतीय वंशाचे विनोद मूर्जानी हे अमेरिकेचे नागरिक आहेत. अमेरिकेत एका टेक्नॉलॉजी फर्ममध्ये ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मूर्जानी हे पत्नी आणि दोन मुलांसह भारताच्या दौऱ्यावर आले होते. वर्जिनियाला परतण्यासाठी ते मुंबईहून दिल्ली, दिल्लीहून रोम आणि तिथून वर्जिनियाला जाणार होते.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आल्यावर खराब हवामानामुळे अनेक विमानांच्या वेळांमध्ये बदल झाल्याचं मूर्जानींना समजलं. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या विमानाची स्थिती पाहण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला.
विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला जोडलेल्या या हेल्पलाईन क्रमांकावर मूर्जानी यांनी दुपारी अडीचच्या सुमारास फोन केला. 'बॉम-डेल स्टेटस' (BOM-DEL status) अशी विचारणा त्यांनी फोनवर केली. 'बॉम' हा मुंबई (पूर्वी बॉम्बे) चा शॉर्ट फॉर्म, तर 'डेल' हे नवी दिल्लीचं संक्षिप्त रुप.
फोन उचललेल्या ऑपरेटरला मूर्जानी काय म्हणाले, हे न समजल्यामुळे त्यांनी पुन्हा बोलण्याची विनंती केली, मात्र तोपर्यंत विनोद मूर्जानी यांनी फोन ठेवला होता. फोन ठेवण्यापूर्वी आपण 'बॉम्ब है' असं ऐकल्याचं ऑपरेटरने सांगितलं आणि तात्काळ संबंधितांना कळवलं.
दुपारी 4.30 वाजता दिल्लीच्या विमानात बसलेल्या मूर्जानी कुटुंबाला खाली उतरवण्यात आलं. दोन तासांनी त्यांना अटक करण्यात आली आणि सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा 15 हजारांच्या जामिनावर मूर्जानींची सुटका करण्यात आली.
'आपण फक्त विमानाचं स्टेटस विचारलं, मात्र ऑपरेटरचा गैरसमज झाला' असा दावा मूर्जानींनी केला. 'मूर्जानी बॉम्बे म्हणाले, मात्र ऑपरेटरने बॉम्ब है ऐकलं' असं मूर्जानींच्या वकिलांनी सांगितलं.
विमानाचं वेळापत्रक बाधित व्हावं, यासाठी विनोद मूर्जानी यांनी खोटा फोन केल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या बातमीत म्हटलं आहे.
यापूर्वीही 'बॉम' (bom) या शब्दामुळे गैरसमज झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल 2016 मध्ये जेट एअरवेजच्या अहमदाबाद-मुंबई विमानात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका तुकड्यावर 'BOMB' लिहिलेलं आढळलं होतं. त्यानंतर विमानात चढलेल्या 125 जणांना विमानातून उतरवण्यात आलं. मात्र तो बोर्डिंग पासचा तुकडा असल्याचा उलगडा नंतर झाला.
विमानतळावरील चेक इन काऊण्टरवरील कर्मचाऱ्याने 'BOM'च्या पुढे गेट क्रमांक 'B' लिहिल्यामुळे हा गैरसमज झाल्याचं नंतर उघड झालं.
बॉम्बची अफवा पसरवल्याचा आरोप, 'बॉम्बे' म्हटल्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2018 01:18 PM (IST)
विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला जोडलेल्या या हेल्पलाईन क्रमांकावर मूर्जानी यांनी दुपारी अडीचच्या सुमारास फोन केला. 'बॉम-डेल स्टेटस' (BOM-DEL status) अशी विचारणा त्यांनी फोनवर केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -