मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मुंबई (Mumbai IIT) येथील दर्शन सोलंकी या 18 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर पवई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. परंतु, जातीभेदाच्या मनस्तापाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. या आरोपानंतर मुंबई आयआयटीकडून याबाबत समिती नेमण्यात आली आहे. 


दर्शन सोलंकी हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्यााने आत्महत्या केली. यानंतर पवई पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु, आता मुंबई आयआयटी मधील 'आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल' या संघटनेने या संदर्भात पत्रक काढून दर्शन याने जातीभेदातूनच आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.  


कॅम्पसमध्ये अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. यातूनच दर्शन याने आत्महत्या केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जातीभेद दिसून येतो. दलित-बहुजन विद्यार्थ्यांना जातीबद्दल आणि आरक्षण विरोधी बोलून हिणवलं जातं. दर्शन सोळंखी याची आत्महत्या याच मनस्तापला कंटाळून झाली असल्याचा संशय या संघटनेने व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संघटनेच्या मागणीनंतर आयआयटीने समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पवई पोलिस देखील या आत्महत्येबाबत कसून तपास करत आहे.  


दरम्यान, मुंबई आयआयटीने देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "काल बी.टेकच्या पहिल्या वर्षाच्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने त्याचे कुटुंबीय आणि मुंबई आयआयटीचेही मोठे नुकसान झाले आहे. दर्शन याच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचं बळ मिळो. या कठीण प्रसंगी संस्था त्याच्या कुटुंबासोबत आहे, असे आयआयटी प्रशासनाने म्हटले. दर्शन याच्या निधनाबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. आमच्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी संस्था आणि विद्यार्थी मार्गदर्शकांनी प्रयत्न करूनही ही घटना टाळता आली नाही हे दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असल्याचे मुंबई आयआयटीने म्हटलं आहे.   


महत्वाच्या बातम्या


Mumbai News : पवई आयआयटीतील विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन