Mumbai News : मुंबईतील पवई आयआयटीमध्ये  (Indian Institute of Technology Mumbai) एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. दर्शन सोलंकी (वय 18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा (Ahmedabad) असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. कालच (11 फेब्रुवारी) त्याची परीक्षा झाली होती आणि आज (12 फेब्रुवारी) त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


दर्शन आयआयटीमध्ये बी. टेकच्या केमिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ आयआयटीच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दर्शनचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पवई पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 
 
दर्शन सोलंकी तीन महिन्यांपूर्वी अहमदाबादहून आयआयटी पवईत आला होता. शिवाय त्याची कालच परीक्षा झाली होती. त्यानंतर त्याने आज आत्महत्या केली. परंतु, दर्शनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  


खोलीत बोर्डवर लिहिला संदेश


दरम्यान, दर्शन याने आत्महत्येपूर्वी माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा संदेश लिहिल्याची माहिती मिळाली आहे. दर्शन याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीतील फलकावर संदेश लिहिला होता. त्यामुळे दर्शनने कोणत्या कारणामुळे आयुष्य संपवलं याचं गूढ कायम आहे


पवई पोलिसात अपघाती मृत्युची नोंद


दरम्यान पवई पोलिसांनी दर्शन सोलंकीच्या मृत्युची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे. या प्रकरणी कलम 174 सीआरपीसी अन्वये अपघाती मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. तीन महिन्यांपूर्वीच आयआयटीमध्ये दाखल झालेल्या दर्शन सोलंकीने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


महत्वाच्या बातम्या


Latur Crime: धक्कादायक! कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचाच केला गेम; लातूर जिल्ह्यातील घटना