मुंबई : मुंबईत एका महिलेची तिच्या पतीने चाकू भोसकून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे पतीने महिलेचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी आणि मयत महिलेचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिला लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्यामुळे घरच्यांनी आठ महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह लावून दिला. लग्नानंतर महिलेने एका मुलीला जन्म दिला.
लग्नानंतर पतीचे आणखी एका स्त्रीसोबत प्रेमसंबंध जुळल्याचं महिलेलं समजलं. यावरुन दोघांमध्ये सतत भांडण होत असल्याचं महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं.
पतीने मंगळवारी अंधेरीतील वर्दळ नसलेल्या भागात पत्नीला नेलं आणि तिच्यावर चाकूने वार केले. महिलेचा मृतदेह रस्त्यावर पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. अंधेरी पोलिसांनी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.