मुंबई : मुंबईतील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत आणलेले पेंग्विन लवकरच सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. या पेंग्विनची क्वारंटाईन कक्षातून प्रदर्शनी भागात रवानगी करण्यात आली आहे.
या नवीन जागेला ते सरावले की आठ दिवसांनंतर हा कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यईल. या जागेतही त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या जागेत ते कसे राहतात याची आठ दिवस पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर हे पेंग्विन सर्वसामान्यांना पाहाण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात हॅम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या शितगृहात (क्वारंटाईन एरियात) ठेवण्यात आलं होतं.
नवीन कक्षाचं कामही अनेक दिवसापासून रखडलं होतं. पण आता हे पेंग्विन मुख्य कक्षात ठेवण्यात आल्याने पेंग्विन पाहण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.