मुंबई : मुंबईत दिवसभर पावसाची उघडझाप होत असली, तरी पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील दादर, हिंदमाता, परेल, सायन यासारख्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातच सकाळपासून लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला. येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय 5 जुलैपर्यंत पालघर, रायगड, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे शहर, घोडबंदर रोड, तलावपाळी परिसर, वागळे इस्टेट, कळवा , मुंब्रा अशा सर्वच ठिकाणी चांगला पाऊस बरसला. काही सखल भागात पाणी साचलं तर पूर्व द्रुतगती मार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी दिसली. याचा फटका रेल्वेसेवेलाही बसला.

नियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतही काही भागात पाणी साचलं. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने खारघरच्या सेक्टर 10 मधील काही रस्त्यांना तलावाचं रुप आलं होतं. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या सीबीडी बेलापूरच्या कोकणभवनलाही पावसाचा तडाखा बसला.

कोकण किनारपट्टीजवळच्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. एकीकडे सुर्या आणि वैतरणा या मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या. तर दुसऱ्या बाजूला जव्हार मोखाडा या टंचाईग्रस्त तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

वसई विरार क्षेत्रात रात्रीपासून पावसाचा जोर जास्त होता. सखल भागातील सोसायट्यांमधील पाणी ओसरायचं नाव घेत नव्हतं. नालासोपारा आचोले रोडवर असलेली पारस सोसायटी, विरारची श्रीराम नगर इमारत अशा काही ठिकाणी सतत चौथ्या दिवशी पाणी साचलेलं होतं.



महापौरांना तुंबलेली मुंबई दिसेना

अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असलं तरी मुंबई कुठे तुंबली आहे? असा उलट प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विचारत आहेत. नालेसफाईची कामं चांगली झाली आहेत. काही तुरळक ठिकाणी पाणी साचलं आहे. या व्यतिरिक्त मुंबई सुरळीतच आहे, कुठेही तुंबलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

महापालिका उपआयुक्तांनीही महापौरांची री ओढत मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला. फक्त काही ठिकाणी पाणी जमा झालं आहे. प्रसारमाध्यमांच्या पाणी तुंबण्याच्या व्याख्या चुकीच्या असल्याचं मुंबई उपआयुक्तांचं म्हणणं आहे. सखल प्रदेशात पाणी साचतंच, असंही ते सांगायला विसरले नाहीत.

अतिवृष्टीचा इशारा

आतापर्यंत महाराष्ट्रात पुरेसा पाऊस पडला नसला तरी येत्या 5 जुलैपर्यंत उत्तर कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि अलिबाग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आलं आहे.