मुंबई : येत्या 31 ऑक्टोबरपूर्वी मुंबईतले सर्व खड्डे बुजवू, असा दावा मुंबई महापालिकेनं आज मुंबई उच्च न्यायालयात केला. पुढच्या पावसाळ्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असल्याचंही पालिकेनं न्यायालयाला सांगितलं.

खराब काम करणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा काम देणं टाळा, रस्त्यांची अवस्था सुधारा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला बजावलं आहे. दिवाळीच्या आधी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

त्याचप्रमाणे येत्या फेब्रुवारीपर्यंत पुढील मान्सूनसाठी आम्ही रस्त्यांच्या बाबतीत पूर्ण सज्ज असू, असंही म्हटलं आहे. मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी दिलेली डेडलाईन उलटून गेली. त्यानंतर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दादरमध्ये खड्ड्यांची पाहणी केली.

मुंबईच्या खड्ड्यावरुन पालिकेत सध्या चांगलंच रणकंदन सुरु आहे. नागरिकांनाही या खड्ड्यामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मनसेने एका अभियंत्याच्या हातात अभियंते खड्ड्यांना दोषी असल्याचा फलक दिल्याने याप्रकरणी चांगलाच भडका उडाला होता.

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 17 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. आता 31 तारखेपर्यंत तरी मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होतात हे पाहावं लागेल.