मुंबई : दिवाळीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे फटाक्यांची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे. बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

बेकायदेशीरपणे उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हायकोर्टाने उपाययोजना सुचवली आहे. फटाक्यांच्या विरोधात चंद्रकांत लासुरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.

राज्यातील सर्व पालिकांनी बेकायदेशीर फटाके विक्रीवर कारवाई करावी असंही कोर्टानं सांगितलं आहे. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषणाच्या समस्येत वाढ होत असल्याचंही कोर्टानं नमुद केलं आहे. त्यामुळे रस्त्यावर फटाके विक्री करणाऱ्यांवर निर्बंध येऊ शकतात.

फटाक्यांचा स्फोट झाल्यास होणारी जीवितहानी ही गंभीर बाब आहे. निवासी वसाहतींत बेकायदा दुकाने थाटून फटाक्यांचा साठा करणार्‍यांचे केवळ परवाने रद्द करुन भागणार नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे, असं मतही कोर्टाने यापूर्वी नोंदवलं होतं.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शाळातून जनजागृती केली जात असल्यामुळे हे प्रमाण कमी होत आहे. अशीच जनजागृती सर्वत्र केली पाहिजे अशा शब्दांत न्यायालयाने मुंबईचे कौतुक केलं होतं.