मुंबईत लँडींग करणाऱ्या वैमानिकाचे आभार माना : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 05 Jan 2018 02:15 PM (IST)
विमानतळाच्या धावपट्टी शेजारी उभारण्यात आलेली एक भिंतही अतिशय धोकादायक असून त्यामुळे टेक ऑफ करताना विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप या याचिकेत करण्यात आला.
मुंबई : मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग करणाऱ्या वैमानिकाचे आभार मानूनच विमानाबाहेर पडायला हवं, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाल्याची चिंता मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली. धावपट्टी शेजारी निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीची अनेक बांधकामं झाल्याचा पुनरुच्चार यानिमित्तानं हायकोर्टाकडून करण्यात आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीभोवती वाढलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे लँडिंग ही गंभीर समस्या झाली आहे. त्यावर तोडगा काढून सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सुरक्षित धावपट्टी उपलब्ध करुन देणं, हीदेखील आता हायकोर्टाचीच जबाबदारी बनल्याचा टोलाही न्यायालयानं यावेळी लगावला. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. विमानतळाच्या धावपट्टी शेजारी उभारण्यात आलेली एक भिंतही अतिशय धोकादायक असून त्यामुळे टेक ऑफ करताना विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप या याचिकेत करण्यात आला. मुळात हे बांधकाम सुरक्षेच्या दृष्टीनं उभारण्यात आल्याचा दावा बचावपक्षाकडून करण्यात आला. विमानाचं टेक ऑफ होताना जेट इंजिनमधून निघणाऱ्या शक्तिशाली थर्स्टपासून बचाव होण्यासाठी धावपट्टी शेजारी हे बांधकाम केल्याचा खुलासा कोर्टासमोर करण्यात आला. याचिकाकर्ता गैरहजर असल्यामुळे हायकोर्टाने या प्रकरणावरील सुनावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे.