मुंबई विमानतळाजवळील टोलेजंग इमारतींची उंची मोजा : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 01 Sep 2016 10:04 AM (IST)
मुंबई : मुंबईतल्या दोन्ही विमानतळांजवळील उंच इमारतींवर गदा येण्याची शक्यता आहे. एअरपोर्टवरील धावपट्टीपासून 4 किलोमीटरच्या परिघातील टोलेजंग इमारतींची उंची मोजण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. या इमारतींवरील पोल्स आणि एँटिना निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंच असतील तर ते तात्काळ पाडण्यात यावेत असं कोर्टानं सांगितलं आहे. त्यासाठी या परिघातील 112 धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशानुसार या परिसरातील सुनिता इमारतीवर कारवाई सुरु केल्याचा दावा पालिकेनं केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून जवळच्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. यशवंत शेणॉय यांनी दाखल केली होती. त्यावर ही सुनावणी करण्यात आली.