मुंबई: देशभरातल्या रेडिओलॉजिस्टनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. पुणे, पिंपरी, नाशिकसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये हा संप पुकारण्यात आला आहे. PCPNDT कायद्यात सुधारण करावी या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या रेडिओलॉजिस्टच्या संघटनांतर्फे केल्या जात आहेत. या बेमुदत संपामुळे मात्र रुग्णांना नाहकपणे वेठीस धरलं जातंय.

 

कायद्याचं पालन करु, पण...

पीसीपीएनडीटी हा कठोर कायदा आहे, त्याचं आम्ही पालन करू, मात्र केवळ तांत्रिक कारणांमुळे सोनोग्राफी सेंटर सिल करणं योग्य नाही, असंही या रेडिओलॉजिस्ट संघटनेचं म्हणणं आहे.

 

आजपासून ठाण्यासह राज्यभरातले सगळे रेडिओलॉजिस्ट बेमुदत संपावर आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५० रेडिओलॉस्ट बेमुदत संपावर आहेत.

 

या संपामुळे ठाणे जिल्ह्यात विविध रेडिओलॉजी सेंटरमध्ये रोज येणाऱ्या सुमारे १२ ते १४ हजार लोकांची चांगलीच पंचाईत झाली.

 

संध्याकाळी उशिरा दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पंतप्रधानांच्यासोबत रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांची एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच या संपात काही तोडगा निघतो का नाही ते कळेल. पण सध्यातरी रेडिओलॉजिस्ट बेमुदत संपावर ठाम आहेत.

 

रेडिओलॉजिस्टच्या मागण्या –

१.       पीसीपीएनडीटी कायद्यानुसार छोट्या आणि तांत्रिक चुकांच्या करता सेंटर बंद करण्याच्या कारवाईला विरोध

२.      दिली जाणारी शिक्षा गुन्हेगारी कायद्यानुसार द्यावी.

३.      पीसीपीएनडीटी संदर्भातला कायदा देशभरात समान असावा.