मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि वानखेडे कुटुंबियांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडेंना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. नवाब मलिकांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 


आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं सांगत ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं. 


नवाब मलिकांनी केलेली वक्तव्यं ही योग्य पद्धतीनं तपासून केलेली नाही असं सांगत न्यायालयाने मलिकांनी भविष्यात या गोष्टीचं भान ठेवावं असं सांगितलं आहे. तसेच नवाब मलिकांनी दोन आठवड्यांत हायकोर्टात प्रतिउत्तर सादर करावं असेही निर्देश दिलेले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. 


दरम्यान, राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी न्यायालयाच्या या निर्देशानंतर सत्यमेव जयते असं ट्वीट केलं आहे. 


 






दरम्यान, नवाब मलिक आणि ज्ञानदेव वानखेडे दोघांकडूनंही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागण्यात आली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला, दाखल्याचा फॉर्म आणि नाव बदलल्याचा दाखला कोर्टात सादर केलं होतं. तर ज्ञानदेव वानखेडे यांनी आपलं जातीचं प्रमाणपत्र आणि समीर वानखेडेंचा जन्म दाखला कोर्टात सादर केला होता. 


समीर वानखेडे यांच्या शाळेचा प्रवेश अर्ज, शाळा सोडल्याचा दाखल्यावर मुस्लिम असं लिहिलेलं आहे. ती कागदपत्रं मुंबई महापालिकेच्या कार्यालयातून नुकतीच मिळाल्याचा दावा मलिक यांनी यात केलेला आहे. तसेच समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे, वानखेडे यांनी मात्र मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मलिक जाणीवपूर्वक वानखेडे कुटुंबियांवर निराधार आरोप करुन लक्ष्य करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तर समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट अधिकृतपणे कागदपत्रे मिळवून टाकल्याचा दावा मलिक यांनी हायकोर्टात केला आहे.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha