Nawab Malik vs Sameer Wankhede : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. नवाब मलिक दररोज नवनवे आरोप करत आहेत. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेत पुरावे सादर करण्यास सुरुवात केली. तसेच समीर वानखेडे मुस्लीम असल्याचाही दावा मलिक यांनी केला, याबाबतची अनेक कागदपत्रे ट्विटरवर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता नवाब मलिक यांनी रविवारी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम वेशात दिसून येत आहेत. नवाब मलिक मौलानासमोर बसलेले दिसत आहेत. नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे लक्ष लागलं आहे. पण नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement


मागील काही दिवसांपासून नवाब मलिक रोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. दुबई दौऱ्यावर असणाऱ्या मलिक यांनी आता मध्यरात्रीची वेळ साधत समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना मलिकांनी प्रश्नही उपस्थित केलाय. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असं मलिकांनी शेअर केलेल्या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहिलेय. 


मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. प्रथमिक अंदाजानुसार वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो आहे. समीर वानखेडे मौलानासमोर सही करण्यासाठी बसलेले दिसत आहेत. या फोटोवर नवाब मलिक आज, सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. 






दरम्यान, मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी कालच वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर मलिक यांनी हा फोटोबॉम्ब टाकलाय.