मुंबई महापालिकेकडे पार्किंगबाबत कोणतंही धोरण नाही, हायकोर्टाने फटकारलं
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 06 Jan 2017 11:04 PM (IST)
मुंबई : मुंबईत कुणीही कुठेही पार्किंग करत, त्यांच्यावर कुणाचंही बंधन नसतं, या शब्दात मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला फटकारलं आहे. जनहित मंच या सामाजिक संस्थेतर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी हे मत व्यक्त केलं. मुंबईतील बेकायदेशीर पार्किंगवर निर्बंध घालावं, जेणेकरून मुंबईतील ट्राफिकची समस्या कमी होईल. या प्रमुख मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता पुढील 5 वर्षांत मुंबईत लोकांना चालायलाही जागा राहणार नाही. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी हा रस्ता वाहतुकीच्या आणि पर्यटनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र ऐन संध्याकाळच्या वेळी तिथं होणाऱ्या पार्किंगमुळे कायम प्रचंड वाहतुक कोंडी असते हे यावरील उत्तम उदाहरण असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर तरी मुंबई महापालिका वाहतुकीच्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून काही पावलं उचलणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.