सरकारनं कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची केलेली सक्ती चुकीची असल्याची टीका खासदार नाना पटोले यांनी केली. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांना बोगस म्हणणाऱ्या मंत्र्यांनी एकदा विचार करावा, अशा सूचना त्यांनी चंद्रकांतदादांना केली आहे.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर काल नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी प्रफुल्ल पटेल आणि नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावरही नाना पटोलेंनी निशाणा साधलाय.
ऑनलाईन फॉर्म
नाना पटोले म्हणाले, “माझा मित्र मुख्यमंत्री झाला त्याचा सर्वात जास्त आनंद मला झाला. पण जे काही चूक असेल, ते बोलून दाखवायचं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळेच कर्जमाफीच्या ऑनलाईन फॉर्मला आम्ही विरोध केला. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. शेतकऱ्याला तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय, तरीही दोन-तीन दिवस फॉर्म भरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्याला मी विरोध केला होता. पण त्यात काही राजकारण, कटकारस्थान नव्हतं”.
शेतकरी बोगस कसे?
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक बोगस शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनही नाना पटोलेंनी निशाणा साधला.
ते म्हणाले, “चंद्रकांत पाटलांचं 10 लाख शेतकरी बोगस असल्याचं वक्तव्य हे चीड आणण्यासारखं आहे. तुमचा 7/12 असल्याशिवाय तुमच्या ऑनलाईन सिस्टिममध्ये फॉर्म जाऊच शकत नाही, तो स्वीकारलाच जात नाही. मग ते शेतकरी बोगस कसे? शेतकऱ्यांना बोगस म्हणणं हे चीड आणण्यासारखंच आहे”
प्रफुल्ल पटेलांवर निशाणा
प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये येत आहेत असं म्हटलं जातं, पण लोक चंद्रावर जायला निघाले आहेत. मात्र नासाने अजून रिपोर्ट पाठवलेले नाहीत, तिथे पाणी आहे का, ऑक्सिजन आहे का, तिथे राहू शकतो का. ज्या गोष्टी नाहीत त्याची चर्चा आतापासून कशाला. जेव्हा होईल, चंद्रावर जायचं वेळ येईल, तेव्हा बोलू, असं नाना पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या
10 लाख शेतकरी बोगस, त्यांनाच कर्जमाफीचे फॉर्म भरताना अडचणी: चंद्रकांत पाटील
चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं म्हणजे पक्षाला विरोध नव्हे : नाना पटोले