मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे पोटवकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूबाबत दाखल जनहित याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहे.

29 ऑगस्टला मुंबईत झालेल्या पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला होता.

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी एक सदस्यीय समिती नेमली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूसंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईतील सर्व मॅनहोल्सच्या सुरक्षेबाबत जाणकारांची उच्चस्तरीय समिती स्थापन करुन उपाययोजना करावी. तसंच अमरापूरकरांच्या मृत्यूला करणीभूत असलेल्या पालिका प्रशासनाकडून 50 लाखांची नुकसान भरपाई वसूल करावी तसेच दोषी अधिकऱ्यांवर तातडीनं करवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

त्यावर आता महापालिकेने उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार 15 दिवसांत महापालिकेकडून अहवाल सादर करण्यात येणार आहे.

दुसरीकडे सुनावणीदरम्यान हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनाही फटकारलं. गुन्हा घडलाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर आधी पोलिसांत गुन्हा दाखल करा. कोणत्या कारणांसाठी जनहित याचिका दाखल करावी यालाही मर्यादा हव्यात, असं हायकोर्टाने सुनावलं.

संबंधित बातम्या

डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका

बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला