Mumbai Rains Local Train: मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी पहाटे या पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सध्या मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. यामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची (Mumbai Local Train) वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Railway) वाहतूक पाच ते दहा मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील (Western Railway) वाहतूक अद्याप सुरळीत आहे. सध्या मुंबई परिसरात आकाशात काळ्या ढगांची गर्दी असून अंधार पसरला आहे. त्यामुळे पावसाचा जोर (Mumbai Rains) वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन तासांपासून न थांबता मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. 

Continues below advertisement

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्याप्रमाणावर चाकरमानी कार्यालयासाठी घराबाहेर पडणार  आहेत. मात्र, मुसळधार पावसाचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काहीवेळापासून दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदमाता चौक येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र, महानगरपालिकेच्या सक्षम मशिनरीच्या मदतीने ते पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथील वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि घाटमाथ्याच्या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. पहाटे पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता ठाणे आणि नवी मुंबईत पु्न्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना आणि अन्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

Mumbai Rain LIVE: मुंबईत मुसळधार पाऊस, पाणी तुंबण्याची शक्यता, लोकल आणि रस्ते वाहतुकीचे अपडेटस्