Mumbai Rain Update: आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला (Heavy rain in Mumbai) सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडींचा सामना यावेळी करावा लागला.
पावसाचा वाहतूकीवर परिणाम
अंबरनाथ, बदलापूरमध्ये देखील गुरुवारी रात्री विश्रांती घेतल्यानंतर शु्क्रवारी सकाळपासून पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली. तर कल्याण डोंबिवलीमध्येही रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यानंतर सकाळी एक तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मुंबई बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई लोकलवर देखील परिणाम झाला. शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटांनी उशीराने सुरु होती. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 5 ते 10 मिनीट उशिराने सुरु होती.
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये देखील सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. सध्या पावसाचा जोर ओसरला जरी असला तरी पावसाची संततधार सरुच आहे. यावेळी एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रेपासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळालं. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस
अंधेरी सबवेमध्ये देखील तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु अर्ध्या तासानंतर पाणी ओसरल्यानंतर पुन्हा अंधेरी सबवे वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. पालघर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं जिल्ह्यातील नदीनाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या भात पेरण्या सुरू केल्या होत्या. पण सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्यामुळे त्या पेरण्याही आता खोळंबल्या आहेत.त्यामुळे सुरु असलेल्या पावसामुळे आता पेरण्या वाहून जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा :
Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम