Shiv Sena BMC Morcha Uddhav Thackeray: मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे.
शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा कशासाठी?
मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.
राज्य सरकारचा बीएमसीमधील 88 हजार कोटींच्या ठेवीवर डोळा'
मुंबई महापालिकेत प्रशासक जरी कारभार पाहत असले तरी याच प्रशासकाद्वारे राज्य सरकारकडून मोठा भ्रष्टाचार विविध कंत्राट देताना होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. मुंबई महापालिकेतल्या 88 हजार कोटींच्या ठेवीवर राज्य सरकारचा डोळा असून मुंबईची वाट लावण्याचे काम केले जात असल्याचं ठाकरे गटाचे म्हणणं आहे.
शिवसेनेचे शक्ति प्रदर्शन
शिवसेनेत वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. उद्धव ठाकरे यांची अनेक नेत्यांनी साथ सोडली. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाची असणार आहे. मुंबईतील नगरसेवकही आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, ठाकरे गटाकडून उद्याचा मोर्चा हा शक्ति प्रदर्शनाचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
> कसे असणार ठाकरे गटाच्या मोर्चाचे स्वरुप?
- ठाकरे गटाचा मोर्चा मेट्रो सिनेमा मरीन लाईन्सपासून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने निघेल
- या मोर्चाचा नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील यामध्ये मुंबईतील सर्व ठाकरे गटाचे आमदार खासदार उपस्थित असतील
- ठाकरे गटाच्या आमदार खासदारापासून ते विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख ,गट प्रमुख अगदी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याच्या आणि बीएमसी भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत
- मुंबईतील सर्वसामान्य जनतेला सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचा आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलाय
- या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचे निवेदन ठाकरे गट देणार नसून मुंबई महापालिका मुख्यालयासमोर स्टेज उभारून मुंबई महापालिका प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात ठाकरे गटाचे नेते भाषण करतील
- मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खाजगी वाहने घेऊन न येता लोकलने प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि चर्चगेट येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत