मुंबई : महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात मांसविक्रीवर बंदीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. राजस्थान संस्कृती संरक्षण संस्थेमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती.


येत्या 9 एप्रिलला महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी त्यादिवशी मांसविक्रीवर बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

यासंदर्भात साल 2003 मध्ये राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात आदेश देऊनही राज्य सरकराकडनं यासंदर्भात कोणतही उत्तर आलं नाही. त्यामुळे 2003 चे परिपत्रक बंधनकारक नाही, असा निर्वाळा देत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. हे निर्देश देताना खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयानं पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी करण्याकरता महानगरपालिकेनं जारी केलेल्या परिपत्रकाला दिलेल्या स्थगितीचा आवर्जुन उल्लेख केला.