डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. धुळ्यातल्या विमानतळावर झालेल्या चाचणीमध्ये या विमानानं यशस्वी उड्डाण केलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशी आणखी विमाने बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अमोल यांना पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचं निश्चित केलं आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातली एक बैठक आयोजित केली आहे.
अमोल यादव यांनी हीच मागणी काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वरून केली होती.
अमोल यादव यांना सहा सीटर आणि 20 सीटर विमानं बांधायची आहेत, ज्यांची 13 हजार फूट उंचीवर उडण्याची त्याची क्षमता असेल. एका वेळी ते विमान 2 हजार किलोमीटर उडू शकेल. या विमानाचा वेग हा 185 नॉटिकल माईल्स असेल.
आपल्या घराच्या गच्चीवर विमानाची निर्मिती करणाऱ्या या अवलियाने विमान क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे, ती त्या विमानातून सर्वसामान्य भरारी कधी घेतात याची.