मुंबई : केंद्रापाठोपाठ राज्यातील कर्मचाऱ्यांनाही लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबत संकेत दिले आहेत. सातव्या वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात 22 ते 23 टक्क्यांची वाढ होईल.

सातव्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 21 हजार 500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. परंतु तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा सहन करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, हा वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सनदी अधिकारी के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात या समितीने अहवाल दिल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

तसंच कोणत्याही कर्मचाऱ्याचं एका पैशाचंही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली.