मुंबई : महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंतच्या वाईन शॉप मालकांना तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठानं दिलेल्या स्थगितीच्या जोरावर याचिकाकर्त्यांची बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती.


मुंबई हायकोर्टाच्या सुट्टीकालीन न्यायालयाचा तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हायवेपासून 500 मीटर अंतरावर असलेली मद्यविक्री बंदच राहणार आहे.

हायवेपासून 500 मीटर अंतरावर दारुविक्रीला बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं लागू केला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळं राज्यभरातले 10 हजार बार आणि परमिट रुम बंद आहेत. त्यामुळे 8 ते 9 लाख लोकांचा रोजगार बुडत असल्याचं आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टींनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महामार्गालगत 500 मीटरच्या आतील सर्व बार, बियर शॉप आणि दारु दुकानं बंद करण्यात येत आहेत. महामार्गालगत असलेल्या जवळपास 15 हजार बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र यासाठीही काही निकष लावण्यात आले आहेत.

ज्या गावाची लोकसंख्या 20 हजाराच्या आत आहे, त्याठिकाणी सगळ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गापासून 220 मीटर अंतरावरील बार बंद होणार आहेत. तसंच बियर शॉप , दारु दुकानंही कायमची बंद होणार आहेत.

20 हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात हे अंतर 500 मीटर असेल. त्यामुळे 20 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमधील मद्यविक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राज्याचं सुमारे 7 हजार कोटी उत्पन्न बुडणार आहे.