मुंबई : रस्ते घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना पुन्हा कामं देण्यावरुन आज हायकोर्टाने पालिकेला चांगलाच दणका दिला आहे. सर्व सहा कंत्राटदारांना दिलेले ठेके रद्द करण्यात यावेत, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
घोटाळेबाजांना पालिका पुन्हा पुन्हा कामं देतेच कशी, असा प्रश्न विचारत हायकोर्टाने यावेळी पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांच्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने पुन्हा काम दिल्याचं समोर आलं होतं. स्थायी समितीने प्रस्ताव सादर करुन त्याला शिवसेना-भाजपने मंजुरीही दिली होती.