मुंबई : मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयी काळजी करायला लावणारा अहवाल जेजे रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी मांडला आहे. देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज असल्याचं समोर आलं आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो.
मुंबईकर हे देशातील सर्वात दुःखी नागरिक असल्याचं केंद्राच्या अहवालात म्हटलं आहे. देशातील प्रथम श्रेणी शहरांशी तुलना करताना मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयीची माहिती समोर आली आहे. मुंबई (38 हजार 588), कोलकाता (27 हजार 394), बंगळुरु (24 हजार 348) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेतात.
विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेतात.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार आहे. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज आहे.
घड्याळाच्या काट्यावर धावण्याची मुंबईकरांची सवयही याला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. जेजे हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं.
10 वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं.
नव्याने उद्भवणारे डिसऑर्डर :
फेसबुक डिप्रेशन
सायबर बुलिंग
ऑनलाईन गेम अॅडिक्शन
बॉडी इमेज इश्यू
मुंबईकरांमध्ये दिसणारे मानसिक आजार
अँक्झायटी आणि ताणतणाव
नैराश्य
बायपोलर डिसॉर्डर
सायकोसिस
ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी)
अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी)
डिमेन्शिया
मानसोपचार घेणारी टॉप 3 राज्यं
पश्चिम बंगाल - 2 लाख 75 हजार 578
महाराष्ट्र - 1 लाख 24 हजार 400
कर्नाटक - 1 लाख 16 हजार 771