मुंबई : "शेर तो शेर ही होता है, उसे किसी की जरुरत नहीं," असं म्हणत अपाटीदार आंदोलनाचा युवा नेता हार्दिक पटेलने शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भाजपवर हल्ला चढवला आहे.


मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी हार्दिक पटेलने शिवसेनेला पाठिंबा देत भाजपवर निशाणा साधला.

"महाराष्ट्राची भूमी ही वीरांची भूमी आहे. त्याच भूमीतील चांगल्या लोकांना भेटायला आलो आहे. सध्या देशाची सत्ता वाईट लोकांची आहे," असं हार्दिक पटेल म्हणाला.

"मी अजून लहान असून शिकत आहे. माझी शिवसेनेला गरज का असेल? शेर तो शेर ही होता है, उसे किसी की जरुरत नहीं, " अशा शब्दांत हार्दिक पटेलने शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली. तसंच जिथे चांगलं होत आहे किंवा ज्यांना काही चांगलं करायचं आहे, तिथे त्यांच्यासोबत आहे, असंही त्याने नमूद केलं.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी उद्धव ठाकरेंची भेट घेता आली नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसंच इथल्या गुजराती समाजाच्या भेटीसाठी मुंबईत आल्याचं हार्दिक पटेलने सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा असला तरी प्रचारात सहभागी होणार नसल्याचंही हार्दिक पटेलने स्पष्ट केलं आहे.

मित्र दगा देईपर्यंत मैत्री तोडत नाही : उद्धव ठाकरे

राजकारण तर चालतच राहील, पण आता आम्ही हार्दिकला मित्र मानलं आहे.  सगळ्या जगाला माहित आहे की आम्ही जेव्हा मैत्री करतो ती शेवटपर्यंत निभावतो. जोपर्यंत मित्र दगा देत नाही तोपर्यंत आम्ही कधी मैत्री तोडत नाही, अश उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

मला 'हार्दिक' आनंद : मुख्यमंत्री

दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेलच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटली आहे, त्यामुळे कोणाला बोलावलं हे पाहून मला 'हार्दिक' आनंद होतो आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसंच नरेंद्र मोदींच्या आधी देवेंद्र फडणवीसला तरी निपटा, असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.