मुंबई : मुलुंड, गोवंडी, देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी आपल्यासह अनेक जण गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. मात्र मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद होत नाही, याचा अर्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आकृती बिल्डरशी सेटिंग आहे, असा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.


मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड्स बंद करण्यासाठी आपल्यासह अनेक जण कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयापासून केंद्र सरकारनेही याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. तरीही मुंबई महापालिकेतील माफिया हे डम्पिंग बंद होऊन देत नाहीत. उद्धव ठाकरेंची आकृती बिल्डरशी सेटिंग आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन खा. राहुल शेवाळेंनी शिवसेना भवनात तातडीने पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमय्या मुलुंडचं डंम्पिंग ग्राउंड बंद करु इच्छितात, कारण त्यामुळे कोणा बिल्डरचा फायदा होणार असा आरोप शेवाळेंनी केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुलुंडच्या सभेत मुलुंड डंम्पिंग ग्राउंड शिवसेना बंद करणार असं जाहीर केलं.

उद्धव ठाकरे यांनी आकृती बिल्डरबरोबर हे डंम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी किती कोटीमध्ये सेटिंग केलं  असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. गेल्या आठवड्यात डम्पिंग बंद करणार नाही सांगितलं आणि या आठवड्यात बंद करणार असं म्हटलं, हीच शिवसेनेची स्टाईल आहे, हीच तर शिवसेनेची खंडणी आहे, असा आरोप सोमय्यांनी केला.