मुंबई : दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (23 सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी पोलीस आणि मुंबई महापालिका सज्ज आहे. गिरगाव चौपटीवरील गणेश विसर्जन सोहळा जागतिक पातळीवर कसा नेता येईल यासाठी बीएमसी आणि महारष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

स्टिंग रे, जेलीफिश सारख्या माशांचा दंश होऊ नये यासाठी भाविकांनी पाण्यात विसर्जनासाठी जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. विदेशी पाहुण्यांसाठी विशेष मंडप, चौपटीवर विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यंदा निलांबरी बसची सुविधाही केली आहे.

जुहू चौपाटी

मुंबई उपनगरातल्या भाविकांसाठी गणेश विसर्जनाची तयारी जुहू चौपटीवरही करण्यात आली आहे. जुहू चौपटीही उद्याच्या विसर्जनासाठी सज्ज झाली असून सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भाविकांना विषारी माशांचा दंश होऊ नये यासाठी दोन ऐवजी चार बोट येथे विसर्जनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस, ट्रॅफिक पोलीस, जीवरक्षक, एनडीआरएफ जवान तैनात असतील.

पवई तलाव

मुंबईतील समुद्र चौपटीप्रमाणे पवई तलावावरही विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणी खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि बीएमसीकडून करण्यात आलं आहे. पाण्यात विसर्जन न करता तराफे आणि बोटीच्या साहाय्याने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी पाच तराफे, दोन बोट, दोन क्रेन येथे ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस, जीवरक्षक, मेडिकल बूथ येथे तैनात असेल.

रस्ते वाहतुकीत बदल


मुंबईत आज ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेशाचं विसर्जन केलं जात असताना वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतुकीचं नियमन केलं जावं यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आज संपूर्ण मुंबईतील 53 रस्ते बंद ठेवले असून 56 रस्ते एक दिशा मार्ग (वन लेन) केले आहेत. काही मार्गांना पर्यायी मार्गही करुन देण्यात आले आहेत. जेणेकरून वाहनचालकांना नियोजन करता येईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासोबतच आज जवळपास तीन हजार ट्रॅफिक पोलीस, स्वयंसेवक ट्रॅफिकचं नियमन करण्यासाठी संपूर्ण मुंबईभर तैनात असतील.