मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये क्षुल्लक कारणावरुन तरुणाची हत्या झाली आहे. गाडीला वाट न दिल्याच्या रागातून गणेश म्हस्के या 22 वर्षीय तरुणाची चार जणांनी हत्या केली. घाटकोपर इथल्या साईनाथ नगरमध्ये काल (19 जून) रात्री ही घटना घडली.

गणेश म्हस्के काल मध्यरात्री साईनाथ नगरमधील एका छोट्याशा रस्त्याच्या कडेला बाईक घेऊन उभा होता. याचवेळी एका इनोव्हा कारमधून चार जण येत होते. मात्र त्यांच्यात गाडी मागे घेण्यावरुन वाद झाला. बाचाबाचीनंतर चौघांनी गणेशला मारहाण करत बाजूच्या नाल्यात ढकलून दिलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी कार सोडून पसार झाले. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. तसंच दोन्ही गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. परंतु क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून एक तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.