मुंबई : देव डी, साहिब बिवी और गँगस्टर यासारख्या चित्रपटांमधील अभिनेत्री माही गिल गुंडांच्या हल्ल्यात थोडक्यात बचावली. ठाण्यातील घोडबंदर परिसरात 'फिक्सर' या वेब सिरीजचं शूटिंग सुरु असताना सेटवर काही गुंडांनी राडा केल्याचा आरोप माहीसह तंत्रज्ञ आणि कलाकारांनी केला आहे.

घोडबंदर परिसरातील एका शिपयार्डमध्ये 'फिक्सर'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरु होतं, त्यावेळी चार गुंडांनी हैदोस घातला आणि मारहाण केल्याचं माहीने सांगितलं. चित्रिकरणाची परवानगी नसल्याचं सांगत त्यांनी समोर येईल त्याला रॉड आणि दंडुक्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. सेटवरील कॅमेऱ्यांसह महागड्या सामानाची तोडफोड केल्याचंही टीमचं म्हणणं आहे.

अल्ट बालाजीची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा 'काल' चित्रपटाचे दिग्दर्शक सोहम शाह यांच्यावर आहे. हल्ल्यात शाह यांच्यासह छायाचित्रकार संतोष थुडियाल जखमी झाले. संतोष यांच्या डोक्याला जखम झाल्यामुळे सहा टाके पडले आहेत. सेटवर गुंडांनी राडा घातला, त्यावेळी वेब सीरिजमध्ये भूमिका करणारे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया, अभिनेता शब्बीर अहलुवालियाही उपस्थित होते.



काही गुंड माझ्या दिशेनेही मारहाण करण्यासाठी आले, मात्र महिलांना हात लावू नका, असं कोणीतरी म्हणाल्यामुळे ते मागे फिरले, असं माहीने सांगितलं. आमच्या वॅनिटी वॅनची तोडफोड झाल्यामुळे सेटवरील तंत्रज्ञांनी मला एका गाडीत सुरक्षित बसवलं, मात्र माझ्या ड्रायव्हरला जबरदस्त मारहाण करण्यात आली, असाही आरोप माहीने केला आहे.

घटनेनंतर पोलिस सेटवर आले आणि त्यांनी चित्रिकरणाची परवानगी नसल्याचं सांगत 50 हजार रुपये घेतले, असंही वेब सिरीजच्या तंत्रज्ञ टीमने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं. शूटिंगचं सामान सोडवण्यासाठी कासारवडवली पोलिसात येण्यास त्यांनी सांगितल्याचंही टीमने म्हटलं.

दरम्यान, या प्रकरणी माही गिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवनात भेट घेणार आहे.