मुंबई : मानखुर्दमधील मंडाळा झोपडपट्टीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. तब्बल 12 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि एनडीआरएफचे जवान यांना यश आलं आहे.


या आगीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव झोपडपट्टीतील रहिवाशांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. केमिकल साठ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

मुंबईत मानखुर्दमध्ये मंडाळा झोपडपट्टीला भीषण आग


मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 17 गाड्या आणि 10 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

मानखुर्दच्या मुंबई-वाशी रस्त्यावरील ट्रॉम्बे नाक्याजवळ ही आग लागली होती. आग लागलेली झोपडपट्टी हायवेच्या अगदी जवळ असून चिंचोळ्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या जवळ जाण्यास अडथळे येत होते. रहिवासी परिसर असल्यानं आगीत सिलेंडरचे स्फोटही झाले.