नवरंग स्टुडिओची आग विझली, अग्निशमन दलाचा जवान जखमी
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 19 Jan 2018 07:52 AM (IST)
तोडी मिल्स कम्पाऊंडमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला रात्री एकच्या सुमारास आग लागली होती.
मुंबई : मुंबईच्या लोअर परेल भागात असलेल्या नवरंग स्टुडिओला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. पण आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. तोडी मिल्स कम्पाऊंडमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला रात्री एकच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि सात वॉटर टँकर्सच्या मदतीने दोन तासात रात्री 3 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्याच यश आलं. नवरंग स्टुडिओ असलेल्या इमारतीच्या चौथ्या इमारतीवर आग लागली. गेल्या 20 वर्षांपासून हा स्टुडिओ बंद आहे. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र स्टुडिओचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकरी करत आहेत. या आगीमध्ये अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला असून त्याला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.