मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लरमुळेच कमला मिलमध्ये आग : अहवाल
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2018 11:49 PM (IST)
कमला मिलमधील आग ही ‘मोजो बिस्त्रो’तील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
फाईल फोटो
मुंबई : कमला मिलमधील आग ही ‘मोजो बिस्त्रो’तील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यासंदर्भातील अहवाल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लर विनापरवाना गच्चीवर थाटण्यात आलं होतं. त्या जागेचे आणि रेस्टॉरन्ट मालक या आगीला जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अहवालानुसार अग्निशमन दलातील 10 अधिकाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी होणार आहे. तर दोन वॉर्ड ऑफिसर आणि आरोग्य अधिकाऱ्यांचाही चौकशीत समावेश असेल. 29 डिसेंबरला मध्यरात्री कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. काय आहे प्रकरण? मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री ही भीषण आग लागली होती. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.