मुंबई : मुंबईत लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साधना हाऊस इमारतीत भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र धुरात घुसमटल्याने अग्निशमनचे 12 जवान जखमी झाले आहेत.

साधना हाऊस या इमारतीत दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास आग लागली होती. आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केलं. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यामध्ये जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही.

साधना हाऊस ही चारमजली इमारत बीडीडी चाळींच्या बाजूला, तर महिंद्रा टॉवरच्या मागील बाजूला आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक व्यावसायिक कार्यालयं असून पूर्वी 'मी मराठी' आणि 'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिन्यांची ऑफिसेस होती.

या परिसरात दाट लोकवस्ती नसली तरी इमारतीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र आगीमुळे वरळी परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. जखमी झालेल्या पाच जवानांना केईएम, तर सहा जणांना पोदारमध्ये दाखल करण्यात आलं आहे.



दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबुरमध्ये इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अंधेरी एमआयडीसीत कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरावा जणांना प्राण गमवावे लागले होते.