मुंबई : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागात सोमवारी संध्याकाळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. 'ईएसआयसी' कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीत सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर 147 जण जखमी झाले आहेत.


कामगार रुग्णालयात दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली होती. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते. धुरात गुदमरल्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे.

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीच्या बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता, तर कूपर रुग्णालयात दाखल केलेल्या एकाला उपचारांदरम्यान प्राण गमवावे लागले. त्यानंतर मृतांचा आकडा सहावर पोहचला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी 147 जणांची सुटका केली. त्यापैकी 15 जखमींना कूपर रुग्णालयात, 23 जणांना जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये, 40 जणांना होली स्पिरीट तर 30 जणांना सेव्हन हिल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.



रुग्णालयात आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ज्या रुग्णांना चालताना त्रास होत होता, त्यांची सुटका करता अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

कामगार रुग्णालय आग : काचेच्या भिंतींची चकाकी जीवावर बेतली


शिडीच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य करण्यात आलं. रुग्णालयातील काही रुग्ण आणि नातेवाईकांनी घाबरुन इमारतीतून उड्या मारल्या. दोराच्या सहाय्याने बाहेर पडताना एका व्यक्तीचा हात सटकून ते खाली पडल्याची घटना कॅमेरात कैद झाली. तर एक महिला खिडकीतून मदतीसाठी विनवण्या करतानाही दिसत होती.



रुग्णालयात आणखी काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरु असताना श्वास गुदमरल्यामुळे अग्निशमन दलाचा जवानही जायबंदी झाला.



रुग्णांच्या नातेवाईकांनी परिसरात गर्दी केली असून आपल्या रुग्णाच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा करताना नातेवाईकही भावूक झालेले पाहायला मिळाले. इमारतीच्या मागच्या बाजूला काही रुग्णांना हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आगीनंतर वीज गेल्याने काळोख झाला, अशी माहिती एका रुग्णाने दिली. अंधारात हात पकडून आठ-दहा रुग्ण जिन्याने खाली आल्याचंही त्याने सांगितलं.



कामगार रुग्णालयाचा गलथानपणा

-हॉस्पिटल प्रशासनाची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नव्हती

-नोव्हेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलकडे मुंबई महापालिकेच्या आपत्कालन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र ही माहिती अद्यापही दिली गेली नाही. पालिकेने वारंवार विचारणा करुनही माहिती देण्यास टाळाटाळ.

-गेली दोन वर्ष हॉस्पिटलमधील स्टाफचं आपत्कालीन नियंत्रण/व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेच नाही. हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने मोठं नुकसान