कल्याण : कल्याणनंतर आता व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्येही चादर गँग सक्रिय झाली आहे. या गँगनं उल्हासनगरचं एक मोबाईल दुकान फोडत त्यातून तब्बल 46 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत.


उल्हासनगरच्या गजबजलेल्या शिवाजी चौकात एक मोठं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुकानाबाहेर घुटमळत उभ्या असलेल्या सहा जणांच्या टोळीनं अचानक चादर उघडली आणि त्यामागे लपत शटर उचकटून एक चोरटा दुकानात शिरला. या चोरट्यानं दुकानात असलेले ऍपल, सॅमसंग, विवो आणि अन्य कंपन्यांचे तब्बल 46 लाख रुपयांचे मोबाईल चोरले आणि पोबारा केला.

सकाळी 10 च्या सुमारास दुकानाचे कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेनंतर दुकानाचे मालक लक्ष्मण ब्रम्हानी यांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकात दिवसरात्र पोलीस असतात, मात्र तरीही ही चोरी झाली. त्यामुळं आता पोलीस आपली अब्रू वाचवण्यासाठी काय करतात, हे बघावं लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ब्रम्हानी यांनी दिली.

कल्याणमध्येही सध्या चादर गँगची दहशत पसरल्याचं पाहायला मिळत आहे. ही गँग दुकानाच्या शटरसमोर चादर धरुन अवघ्या काही मिनिटात हात साफ करुन जाते. चार जण एका दुकानाबाहेर येतात, त्यातला एक जण चादर झटकण्याचं नाटक करतो, तर तिघे शटर उचकटतात, याचवेळी त्यांच्यातला एक जण आत जातो आणि आरामशीर दुकान साफ करुन पुन्हा तशाच पद्धतीने बाहेर येतो.

कल्याणमध्ये अशाप्रकारे केलेल्या चोरीत एका दुकानातून 18 लाखांचे आयफोन आणि दोन लॅपटॉप, तर दुसऱ्या दुकानातून पाच लाखांचे मोबाईल चोरी करण्यात आले आहेत. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ आणि एमएफसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गँगचा शोध घेणं हे सध्या पोलिसांसमोर आव्हान बनलं असून व्यापाऱ्यांमध्ये यामुळे धास्ती पसरली आहे.