मुंबई : माहुलच्या आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानातून पोलिसांनी बाहेर काढल्याने अख्खी रात्र त्यांना मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाच्या फलाटावर थंडीत काढावी लागली आहे. दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन देण्यात यावं या मागणीसाठी माहुल मधील स्थालांतरीत रहिवाशांच आंदोलन सुरु आहे.

तानसा जलवाहिनी प्रकल्पग्रस्तांचं चेंबुर जवळील माहुल गांवात पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी कारखाने, रिफायनरीमुळे फैलावलेलं भीषण प्रदुषण, रोगराईंमुळे कायमस्वरुपी दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन देण्यात यावं यासाठी माहुल मधील रहिवाशांचा जीवन बचाओ आंदोलन आझाद मैदानावर सुरु आहे. मात्र काल रात्री आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून बाहेर काढलं. त्यामुळे त्यांना अख्खी रात्र सीएसएमटी स्थानकाच्या फलाटावर थंडीत कुडकुडत काढावी लागली.

आंदोलनाला 50 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी याची दखलही घेतली नाही असं आंदोलनर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय रात्रीतून रहिवाश्यांना आझाद मैदानातून बाहेर काढल्याने सरकारच्या विरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.