मुंबई : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह पाच महिलांवर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
इंद्राणी मुखर्जीवर स्वत:ची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
भायखळा जेलमध्ये 35 वर्षी मंजुळा शेट्ये या महिला कैदीची कथित हत्या झाली होती. याविरोधात तुरुंगातील महिला कैद्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. यामध्ये तुरुंगातील अनेक कर्मचारी जखमी झाले होते.
इंद्राणी मुखर्जीने महिला कैद्यांना हिंसक आंदोलनासाठी प्रवृत्त केलं आणि मुलांचा वापर मानवी ढाल म्हणून करण्यास सांगितलं, असा आरोप तिच्यावर आहे. भायखळा जेलमध्ये महिला कैद्यांना सहा वर्षांच्या मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी आहे.
जेल अधीक्षक, 5 गार्ड्स विरोधात गुन्हा
जेल अक्षीक्षकाने मंजुळा शेट्येला कथित मारहाण केली होती. पण तुरुंग अधिकांऱ्यांच्या मते, तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होतं. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातून खुलासा झाला की, तिच्या डोक्यावर अनेक जखमा झाल्या होत्या, शिवाय अंतर्गत जखमाही झाल्या होता. या अहवालानंतर भायखळा जेलच्या अधीक्षक मनीषा पोखरकर आणि 5 गार्ड्सविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्राथमिक तपासात समोर आलं की, "मनिषा पोखरकर यांनी 23 जून रोजी मंजुळा शेट्येला कथितरित्या थोबाडात लगवाली होती आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता." यानंतर इंद्राणी मुखर्जीने कैद्यांना भडकावण्यास सुरुवात केली. "मंजुळा शेटेच्या मृत्यूनंतर इंद्राणीने कैद्यांना आंदोलन करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर मुलांचा ढाल म्हणून वापर करण्यास सांगितलं, जेणेकरुन जेल प्रशासन त्यांच्याविरोधात बळाचा वापर करणार नाही," असं सुत्रांनी सांगितलं.