मुंबई: येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. विशेषतः मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
दरम्यान, मुंबईत काल झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीनं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. गेल्या 24 तासात 5 टक्क्यांनी जास्त पाणीसाठी या तलावांमध्ये झाला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गासह रायगडमध्येही पावसानं संततधार लावली आहे. तर मुंबई ठाण्यात तर पावसानं थैमान घातलं. पण त्याचवेळी पावसाची खरी गरज असलेल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र पावसानं अजूनही दडीच मारलेली आहे.
मराठवाड्यातला बीड जिल्हा वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाने दर्शन दिलेलं नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस वगळता. उर्वरित मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. तर तिकडे विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे दोन्ही विभागातल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आ वासून उभं आहे.