जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन वेळापत्रकात दादर ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
गर्दीच्या स्थानकांवरुन 40 जादा फेऱ्या सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर वाढवण्यात आलेल्या फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर, कुर्ला आणि वडाळा या स्थानकातून सुटणार आहेत.
नवीन वेळापत्रक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होत असून यामध्ये नवीन फेर्या प्रवाशांना मिळतील. यातील बहुतांश फेर्या फक्त उपनगरांतील प्रवाशांसाठीच आहेत.
सध्या 86 लोकलच्या 1 हजार 323 लोकल फेर्या पश्चिम रेल्वेमार्गावर होतात. गेल्या दोन वर्षात पश्चिम रेल्वेवरील लोकल फेर्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्या तुलनेत प्रवासी संख्या वाढल्याने लोकलवर प्रवाशांचा भार वाढत गेला.
नवीन वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर 32 वाढीव फेर्या प्रवाशांना मिळणार असून यामध्ये 15 फेर्या डाऊन, तर 17 फेर्या अप मार्गासाठी असतील. 32 पैकी 20 लोकल फेर्या फक्त अंधेरी ते विरार, विरार ते अंधेरीदरम्यानसाठीच आहेत.