मुंबई : मुंबईतील एका माजी हॉकीपटूची त्याच्या पत्नीनंच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 52 वर्षीय
अप्पय्या चेनंदा यांची चाकूनं 9 वेळा भोसकून तिने हत्या केली. झटापटीत आरोपी पत्नीही जखमी झाली आहे.

प्रॉपर्टीच्या वादातून अप्पय्या यांची अमितानं हत्या केल्याची माहिती आहे. अमिता ही अप्पय्या यांची दुसरी पत्नी होती. मुंबईतल्या मालाडमधील ध्रुव पार्कमध्ये अग्रवाल ट्रिनिटीत 27 व्या मजल्यावर ते राहत होते.

शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये मालमत्तेवरुन वाद झाला. त्यानंतर अमितानं
अप्पय्यांच्या छातीवर बसून चाकूनं तब्बल 9 वेळा भोसकलं.

गंभीर जखमी झालेल्या अप्पय्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. हत्येच्या वेळी झालेल्या झटापटीत अमिताही जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अप्पय्या यांचा मुलगा गणपतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमिताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताला अटक करण्यात येईल.

अप्पय्या एका डेटा कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यावेळी त्यांचं सूत अमिताशी जुळलं. त्यामुळे विवाहित असूनही त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची पहिली पत्नी बंगळुरुत राहायला लागली, तर त्यांचा मुलगा गणपती वडिलांसोबतच राहत होता.