कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2017 05:43 PM (IST)
चैतन्य जोशी नावाचा विद्यार्थी मुंबईतल्या वडाळ्यात राहतो. मुंबई विद्यापीठा अंतर्गत एचआर कॉलेमध्ये रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण त्याने घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला कॅनडातल्या Fanshawe university मध्ये प्रवेश घ्यायचा होता.
मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळू न शकल्यानं कुलगुरु संजय देशमुख यांनी स्वत: 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लावण्यात आले. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलं आहे. चैतन्य जोशी नावाचा विद्यार्थी मुंबईतल्या वडाळ्यात राहतो. मुंबई विद्यापीठा अंतर्गत एचआर कॉलेमध्ये रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण त्याने घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला कॅनडातल्या Fanshawe university मध्ये प्रवेश घ्यायचा होता. 50 हजार रुपये डिपॉझिट भरुन त्यानं जानेवारीमध्ये प्रवेशाचं पत्रही मिळवलं. पण मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही चैतन्य जोशीचा निकाल लागला नाही. परिणामी परदेशात जाऊन शिकण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे. चैतन्यचे फक्त 50 हजार रुपयेच वाया गेले असं नाही तर त्याचं वर्षही वाया जाणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारा चैतन्य एकटा विद्यार्थी नाही. विद्यापीठानं निकालाची डेडलाईन हुकल्यानं त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आहे.