मुंबई : मुंबईतील सांताक्रुझमध्ये डबल डेकर बेस्ट बसचा विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ओव्हरहेड रेलिंगला बसचा वरील भाग धडकून अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.


वांद्र्याहून कलिना विद्यापीठाच्या दिशेने जाताना सांताक्रुझजवळ हा अपघात झाला. ठराविक उंचीखालील वाहनांनाच या रस्त्याने प्रवेश असल्यामुळे तिथे बॅरिकेट लावण्यात आला होता. मात्र त्यावरच डबल डेकर धडकली.

उंची मर्यादा असतानाही या मार्गाने बेस्ट बस कशी काय गेली? बस नवीन मार्गाने जात होती का? चालकाला उंचीचा अंदाज आला नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल सुरु होते. अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. हा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

अंधेरी, विलेपार्ले, घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ल्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. लालबाग, परळ, दादर या भागातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. खार सबवे, एस. व्ही रोड आणि एलबीएस रोड अशा सखल भागात पाणी भरले आहे. या पावसाने काही ठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली.