मुंबई : आगीच्या घटनांचं सत्र मुंबईत सुरुच आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळावर आज दुपारी आग लागली. दुपारी अडीचच्या सुमारास व्हीआयपी लॉन्जला लागलेल्या आगीत संपूर्ण लॉन्ज जळून खाक झालं.
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नसलेली तरी लॉन्जचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय विमानतळासारख्या ठिकाणी लागलेल्या या आगीने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मुंबईत कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीत 14 जणांना प्राण गमवावे लागले होते. शिवाय त्यानंतरही अनेक आगीच्या घटना मुंबईत घडल्या. त्यातच आता मुंबई विमानतळावरील आगीची घटना समोर आली. त्यामुळे आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी खबरदारी घेणं गरजेचं आहे.